Virat Kohli IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका २२ जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. अनेक युवा खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत दमदार कामगिरी करत विराट कोहलीच्या संघातील स्थानाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत एक प्रतिभावान खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करून विराटला चांगलीच स्पर्धा देऊ शकतो अशी चर्चा आहे.
भारतीय संघात सध्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. अशा वेळी टीम इंडियात एक दमदार फलंदाज आहे, जो तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करून विराट कोहलीची जागा हिरावून घेऊ शकतो. हा फलंदाज विंडीजविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर धमाकेदार खेळला तर विराट कोहलीचे टेन्शन नक्कीच वाढू शकते. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) हा सध्या जगातील सर्वात दमदार आणि स्फोटक फलंदाज मानला जातो. सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानात चौकार-षटकारांची बरसात करू शकतो.
तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा 'फेव्हरेट' खेळाडू आहे यात वादच नाही. तशातच आशिया चषक 2022 आणि T20 विश्वचषक 2022 साठी सूर्यकुमार यादव खूप महत्त्वाचा आहे. सूर्यकुमार यादव टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना चांगली कामगिरी करत आहे. भारताला या वर्षी ऑगस्टमध्ये आशिया चषक 2022 आणि ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. त्यासाठी सूर्यकुमारची बॅट तळपणे महत्त्वाचे आहे. तशातच हार्दिक पांड्यासारखा ( Hardik Pandya ) खेळाडू चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करताना दिसतोय. तर रिषभ पंत ( Rishabh Pant ) आणि दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) हे दोघेही मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावण्याची क्षमता राखतात. त्यांच्यासोबतच सातव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजासारखा अष्टपैलू आहे. त्यामुळे विराटचं टेन्शन अजूनच वाढण्याची शक्यता आहे.