नागपूर - काही दिवसांपूर्वी खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा उपस्थित करत कर्णधार विराट कोहलीनं बीसीसीआयच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले होते. खेळाडुंना तयारीसाठी पुरेसा वेळ एकापाठोपाठ मालिका आणि दौरे आयोजित केल्यामुळे मिळत नाही. त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम होतो, असे विराटने म्हटले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने विराटच्या या वक्तव्याला दुजोरा दिला असून तसेच विराटला काही काळ क्रिकेटपासून दूर राहून विश्रांती घेण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. त्याने या काळात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी, असे म्हटले.खेळाडुंवर सततच्या क्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाविषयी विराट कोहलीने जाहीरपणे वक्तव्य केले, ते योग्यच होते. भारतीय संघ आगामी काळात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्यादृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीने या दौऱ्यापूर्वी विश्रांती घेणे आवश्यक आहे. कोहलीने त्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपवावे. जेणेकरू कोहलीला या काळात आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल.
महेंद्रसिंह धोनी कर्णधार असतानाही त्याने अशाप्रकारचा ब्रेक घेतला होता. त्यावेळी त्याने संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर दिली होती. भारतीय संघ एकही सामना तेव्हा हरला नव्हता. आतादेखील श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा पराभव होईल, अशी परिस्थिती दिसत नाही. कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा उत्तमपणे पार पाडेल, असा विश्वास यावेळी सेहवागने व्यक्त केला.