नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या एका खेळाडूला चक्क सचिन तेंडुलकर असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसुन शाहिद आफ्रिदी आहे. आफ्रिदी हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा सचिन तेंडुलकर असल्याचे सेहवाग म्हणाला. ''पाकिस्तानविरुद्धच्या माझ्या पहिल्या मालिकेपूर्वी सर्वांच्या तोंडावर आफ्रिदीच्या नावाची चर्चा होती. जसा आमच्याकडे सचिन तेंडुलकर होता. तसाच तो पाकिस्तान संघाचा तेंडुलकर होता,'' असे मत सेहवागने गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
सेहवागने यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेवर भर दिला. तो म्हणाला,''दोन्ही देशांतील प्रत्येकाला भारत आणि पाकिस्तान मालिका पाहायची आहे. क्रिकेटपटू म्हणून मलाही हे दोन देश एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला आवडतील. दोन्ही देशांतील सरकार याबाबतीत चर्चा करून भारत-पाकिस्तान मालिकेला हिरवा कंदील दाखवतील, अशी आशा आहे.''
सेहवाग आणि तेंडुलकर यांनी भारतासाठी 93 वन डे सामन्यांत सलामीला फलंदाजी केली आहे आणि 42.13 च्या सरासरीने 3919 धावा केल्या आहेत. सेहवागने 104 कसोटी सामन्यांत 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने 251 वन डे सामन्यांत 35.05 च्या सरासरीने 8273 धावा केल्या आहेत.