कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेलाही हतबल केलं आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा... रुग्णांना उपचारासाठी बेड्स मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर हे सर्व मिळेलच याची गॅरंटी नाही. फक्त सामान्य व्यक्तींनाच नव्हे तर क्रिकेटपटूंनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. सुरेश रैनानं काही दिवसांपूर्वी त्याच्या काकीसाठी ऑक्सिजन सिलेंडरसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती, हरभजन सिंग यानंही त्याच्या मित्रासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मागितले होते. या दोघांनाही बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं ( Sonu Sood) मदत केली. पण, अजूनही असे बरेच जणं आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.
सध्या भारतात ऑक्सिजन संचाच्या तुडवड्याची समस्या गंभीर होत चालली आहे आणि त्यासाठी सरकारपासून प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानंही मदतीचा हात पुढे केला आहे. सेहवागनं दिल्लीत एक ऑक्सिजन संचाची बँक तयार केली आहे आणि त्या माध्यमातून तो गरजूंना मोफत सुविधा पुरवत आहे. त्याच्यासोबत या समाजकार्यात अन्य काही NGO ही आहेत. सेहवागनं याची माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाहा तो काय म्हणतोय?
देशात प्रथमच चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या आत नोंदविण्यात आली, तर चार लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४ हजार ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. २ महिन्यांनी अडीच लाखांच्या जवळपास नवे रुग्ण नोंदविले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला २ लाख ५९ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते.