Join us  

‘कपिलसारखे बनायचे होते; पण बनलो फिरकी गोलंदाज’

फिरकीपटू रविचंद्रन आश्विनचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 6:02 AM

Open in App

बंगळुरू : वयाच्या आठव्या वर्षी मला फलंदाजीतच रुची होती. सचिन आणि कपिलदेव माझे आदर्श होते. कपिलची फलंदाजी मन प्रसन्न करणारी होती. वडिलांच्या सल्ल्यामुळे मी मध्यम गोलंदाजीही सुरू केली. कपिलदेव यांच्यासारखा अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येण्याची इच्छा होती. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. फिरकी गोलंदाजीतच कारकीर्द घडू शकली, असा खुलासा भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विन याने केला.

 ३५ वर्षांच्या आश्विनने कपिलदेव यांचा ४३४ बळींचा विक्रम ८५ व्या कसोटीत मागे टाकला. अनिल कुंबळेपाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा तो सर्वांत यशस्वी गोलंदाज बनला आहे. स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर अश्विन म्हणाला, ‘२८ वर्षांआधी मी आपले वडील आणि आजोबांसोबत कपिलदेव यांनी सर रिचर्ड हॅडली यांचा विक्रम मोडीत काढला. त्यावेळी यांच्यासाठी टाळ्या वाजविल्या. मी मात्र फलंदाज बनू इच्छित असल्याने कपिल यांचा विक्रम मागे टाकेन, असा स्वप्नातही विचार केला नव्हता.  १९९४ ला फलंदाजी माझी आवडती गोष्ट होती. सचिन तेंडुलकर त्यावेळी प्रतिभावान फलंदाज होता. आता मी ऑफ स्पिनर बनलो. इतकी वर्षे भारतासाठी खेळत आहे. देशासाठी अशी कामगिरी माझ्या हातून घडेल,’ असाही विचार मनात आला नव्हता, असे आश्विनने म्हटले आहे.

वॉर्नने फिरकीला नवी ओळख दिली शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूवर माझा विश्वासच बसत नाही. या महान गोलंदाजाने फिरकी गोलंदाजीला नवी ओळख आणि आक्रमकता दिली. वॉर्नने फिरकीला विश्व क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले. जगात सर्वाधिक बळी घेणारे तीनही गोलंदाज हे फिरकीपटू आहेत. तो फारच मनमिळाऊ होता. ऑस्ट्रेलियातील सर्वच महान खेळाडूंनी त्याच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. आयुष्य किती क्षणिक आहे. पुढच्या क्षणी काय घडेल, याचा कुणीही वेध घेऊ शकत नाही. एक हजारावर आंतरराष्ट्रीय बळी घेणारा वॉर्न खरोखर दिलखुलास जगला. फिरकीला आक्रमकता देणारा हा खेळाडू क्रिकेटमध्ये अजरामर राहील, यात शंका नाही.

टॅग्स :आर अश्विन
Open in App