ठळक मुद्देगौतम गंभीर अडचणीत सापडण्याची चिन्हे 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटानवी दिल्ली साकेत न्यायालयाचा अटकेचा आदेश
नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारलेल्या गौतम गंभीर अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. नवी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारताचा माजी सलामीवीर गंभीरच्या अटकेचे आदेश दिले आहे. गंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणुक दारांच्या पैसे लाटण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदिच्छादूत असल्यामुळे गंभीरही अडचणीत सापडला आहे.
रुद्रा ग्रुपने गंभीरच्या नावाखाली गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. मात्र, या कंपनीला आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आले आणि त्यांच्यावर फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची गंभीरने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. साकेत न्यायालयाचे न्यायाधीश मनिष खुराणा यांनी गंभीरच्या अटकेचे आदेश दिले. याचिका फेटाळूनही गंभीर न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर न राहिल्याने हे आदेश देण्यात आले.
भारताचा यशस्वी सलामीवीर म्हणून गंभीर ओळखला जातो. भारताला 2007 चा ट्वेंटी-20 आणि 2011चा वन डे विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध 54 चेंडूंत 74 धावा केल्या होत्या आणि भारताने तो सामना 5 धावांनी जिंकला होता. वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्या 97 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला नमवले होते. गंभीरने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने 58 कसोटीत 4154 धावा, 147 वन डेत 5238 धावा आणि 37 ट्वेंटी-20 सामन्यात 932 धावा केल्या आहेत.
Web Title: Warrant issued against Gautam Gambhir by Delhi court in real estate fraud case
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.