Join us  

आम्हालाही हवी ‘पगारवाढ’, खेळाडूंनी कर्णधाराला केले पुढे

अतिरिक्त क्रिकेटमुळे पडत असलेला शारिरीक ताण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) विश्रांतीची मागणी करणा-या कर्णधार विराट कोहलीने आता नवा मुद्दा उपस्थित केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 1:53 AM

Open in App

नवी दिल्ली : अतिरिक्त क्रिकेटमुळे पडत असलेला शारिरीक ताण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) विश्रांतीची मागणी करणा-या कर्णधार विराट कोहलीने आता नवा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या वतीने पुढाकार घेत कर्णधार म्हणून कोहलीने बीसीसीआयकडे थेट पगारवाढीची मागणी करत सर्वांचे लक्ष वेधले. दखल घेण्याची बाब म्हणजे या मुद्यावर आता ‘सीओए’ने नवी दिल्लीत श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी लढत झाल्यानंतर विशेष बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले आहे.काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त क्रिकेट खेळावे लागत असल्याने क्रिकेट वेळापत्रकावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कोहलीने जाहीरपणे बीसीसीआयवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे खेळाडूंच्या वतीने वेतनवाढीची मागणी करताना कोहलीने आपल्यासोबत वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही घेतले आहे. यामुळे बीसीसीआयवर प्रचंड दबाव आल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठीच ‘सीओए’ अध्यक्ष विनोद राय यांनी नवी दिल्लीतील कसोटी सामना झाल्यानंतर कोहली, धोनी आणि शास्त्री यांच्यासह वेतनवाढीच्या मुद्यावर बैठक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.वेतनवाढीचे कारण म्हणजे बीसीसीआयला करोडो डॉलरच्या रुपाने होत असलेला वार्षिक नफा. बोर्डाला दरवर्षी विविध कराराद्वारे करोडो डॉलरचा नफा होत असून यातील काही हिस्सा खेळाडूंना मिळावा, अशी मागणी कोहली कंपनीने केली आहे. त्यामुळेच सध्या वार्षिक कराराद्वारे मिळत असलेल्या वेतनामध्ये मोठी वाढ करण्याची अपेक्षा खेळाडूंनी केली आहे. दरम्यान, गेल्याच मोसमामध्ये (२०१६-१७) बीसीसीआयने खेळाडूंच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ केली होती. यानुसार ‘अ’ श्रेणी खेळाडूंना एक करोडऐवजी दोन करोड रुपयांचे मानधन देण्याचे ठरले. तसेच, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील खेळाडूंच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करताना ती अनुक्रमे एक करोड आणि ५० लाख रुपये इतकी करण्यात आली. मात्र, नुकताच बीसीसीआयने ‘आयपीएल’च्या पुढील चार सत्रांचे प्रसारण हक्क सुमारे १६ हजार करोड रुपयांना विकल्यानंतर, या रग्गड कमाईतील काही हिस्सा आम्हालाही देण्यात यावा, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ