नवी दिल्ली – क्रिकेट खेळाडूंची लग्झरी लाईफ सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक मॅचमागे कोट्यवधीची कमाई क्रिकेटमधील खेळाडू करत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे, क्रिकेटपटू किंवा माजी क्रिकेटर्स यांचे आयुष्य भारतात जसं श्रीमंतात आहे तसं प्रत्येक देशात नाही. अनेक देशातील माजी क्रिकेटर्सची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येते.
असाच एक आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या मोठ्या नावापैकी एक समोर आला आहे. वेस्टइंडिजचे माजी वेगवान गोलंदाज पॅट्रीक पैटरसन यांचे सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. पैटरसन यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता त्यांच्या मदतीसाठी भारताचा गोलंदाज आर अश्विन पुढ सरसावला आहे. आर अश्विनने ट्विटरवर पोस्ट करून या दिग्गज खेळाडूसाठी मदतीचं आवाहन केले आहे.
यात म्हटलंय की, पॅट्रिक पैटरसन यांना त्याच्या जीवनात मदतीची गरज आहे. भारतीय चलनात मदत करण्याचा पर्याय नाही परंतु जर कोणी मदत करू शकत असेल तर कृपया पैटरसन यांना मदत करा असं आवाहन आर. अश्विनने ट्विटरमध्ये केले आहे. पैटरसन यांच्यावर पहिलं ट्विट भारत सुंदरसन यांनी केले होते. भारतने म्हटलं होतं की, पॅट्रिक पैटरसन यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यांच्याकडे किराणा माल खरेदी करण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था करणंही जड जात आहे. कृपया पैटरसन यांची मदत करावी.
पॅट्रिक पैटरसन यांनी वेस्टइंडिजसाठी १९८६ मध्ये पर्दापण केले होते. पॅट्रिक पैटरसन यांनी २८ कसोटी सामन्यात ९३ विकेट्स घेतल्या आहेत. तर ५९ एक दिवसीय सामन्यात ९० पेक्षा अधिक विकेट्स नोंदवल्या आहेत. पैटरसन यांनी भारताविरुद्धच्या एका सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले होते. १९८७ मध्ये नोव्हेंबरमध्ये दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात पैटरसन यांनी २४ रन देऊन ५ विकेट घेतल्या होत्या. पैटरसन यांच्या या कामगिरीमुळे भारताची पहिली इनिंग अवघ्या ७५ धावात गुंडाळली होती. या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला होता.