नवी दिल्ली : क्रिकेट इतिहासामध्ये आजचा दिवस खास आहे आणि वेस्ट इंडिजच्या संघासाठी तर अविस्मरणीय असाच. कारण याच दिवशी वेस्ट इंडिजने दोन विश्वचषकांना गवसणी घातली होती. तुम्हाला वाटत असेल की, हे शक्य आहे तरी कसे. पण ही गोष्ट घडलेली आहे. यामधली विशेष गोष्ट म्हणजे हे दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजने भारतामध्ये पटकावले आहेत.
दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 3 एप्रिल 2016. या दिवशी ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवला गेला होता. वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारतावर मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजपुढे आव्हान होते ते इंग्लंडचे. या सामन्याच्या अखेरच्या षटकांत वेस्ट इंडिजला विजयासाठी 19 धावांची गरज होती. बेन स्टोक्स हा गोलंदाज होता, तर फलंदाजीला होता कार्लोस ब्रेथवेट. या षटकाच्या पहिल्या चारही चेंडूंवर षटकार ठोकत ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला विश्वचषक जिंकवून दिला होता.
हा झाला एक विश्वविजय, मग दुसरा विजय त्यांनी मिळवला तरी कुठे आणि कसा. पुरुषांच्या सामन्यापूर्वी महिलांचा ट्वेन्टी-20 विश्वचषकातला अंतिम फेरीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजपुढे आव्हान होते ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या महिलांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घातली होती. आणि वेस्ट इंडिजला एकाच दिवसात दोन विश्वचषक पटकावण्याचा इतिहास रचता आला.