कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशच्या संघाने जो राडा घातल्या त्यावरुन ते टीकेच धनी ठरत आहेत. कारण मैदानात आणि ड्रेसिंगरुममध्ये जो काही प्रकार घडला तो खेळभावनेला बट्टा लावणारा नक्कीच होता. या साऱ्या प्रकारानंतर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. जे काही आमच्याकडून घडलं ते व्हायला नको होतं, अशी प्रांजळ कबूली त्याने यावेळी दिली आहे.
सामन्याच्या शेवटच्या षटकात जे नाट्य घडलं ते काही चाह्त्यांच्या पचनी पडलेले नाही. अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला.
या साऱ्या प्रकाराबद्दल शकिब म्हणाला की, " आमच्याकडून जे घडलं तो खेळाचाच एक भाग असू शकतो. कारण हा सामना जिंकून आम्हाला अंतिम फेरीत पोहोचायचे होते. जर आमच्यावर अन्याय होत असेल तर त्यावर आम्हाला वाचा फोडायलाच हवी. पण त्यानंतर जे काही घडेल ते व्हायला नको होते. पण यापुढे आमच्याकडून असा प्रकार घडणार नाही, याची आम्ही दखल घेऊ. "