भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामना उद्या रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील वेळेमध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधला पहिला वनडे सामना भारतामध्ये सकाळी सुरु होणार आहे. पण भारतात सकाळी किती वाजता हा सामना सुरु होईल, ते जाणून घ्या...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. हॅमिल्टन येथे हा सामना होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. संघाचा महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघारी परतला आहे. त्यामुळे वन डे आणि कसोटी मालिकेत रोहित खेळणार नाही. त्याच्या जागी संघात मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आलाय खरा, परंतु रोहितनं माघार घेतल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. सलामीला कोणती जोडी येणार, मधल्या फळीत कोण खेळणार, याचा विचार कोहलीच्या डोक्यात आतापासूनच सुरू झाला आहे.
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शिखर धवनला दुखापत झाली आणि त्यानं मालिकेतूनच माघार घेतली. त्याच्या जागी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली. त्यात आता रोहितनं माघार घेतल्यानं वन डे संघातील नियमित सलामीची जोडीच नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नवीन जोडी सलामीला खेळताना दिसेल की लोकेश राहुल ओपनिंग करेल याची उत्सुकता लागली आहे. पण, सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या वन डे सामन्यात अंतिम अकरा खेळाडू निश्चित झाले आहेत.
पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या रोहित शर्माच्या पोटरीला दुखापत झाली. त्या सामन्यात वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यानं 41 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. एमआरआय स्कॅनमधून त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
विराट कोहलीने दिले संकेत...वन डे मालिकेत रोहित नसणे हे आमचे दुर्भाग्य. वन डेतील त्याची कामगिरी सर्वांनाच माहीत आहे. त्याचे तंदुरुस्त होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ सलामीला येईल, लोकेश राहुल मधल्या फळीची जबाबदारी सांभाळेल, असे स्पष्ट संकेत कर्णधार विराट कोहलीनं दिले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या अर्ध्या तासापूर्वी नाणेफेकीचा कौल होणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता नाणेफेक करण्यात येइल. त्यानंतर कोणता संघ प्रथम फलंदाजी करणार आणि कोणत्या खेळाडूंना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देणार, हे कळी शकेल.