हैदराबाद : भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन कर्णधारांमध्ये बीसीसीआयच्या बैठकीमध्ये मतमतांतरे पाहायला मिळाली. यावेळी रोहितने, जर जसप्रीत बुमरा फिट असेल तर त्याला खेळवायचे नाही का? असा थेट सवाल कोहली आणि बीसीसीआयला विचारला आहे.
या बैठकीमध्ये इंग्लंडमधील विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली कशी करता येईल, हा विषय निघाला. विश्वचषकात खेळताना खेळाडू ताजेतवाने असायला हवेत, त्यासाठी खेळाडूंनी आयपीएल खेळू नये, असे आपले मत व्यक्त केले होते.
हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते. यावेळी भारताच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाबाबतची बातचीत करण्यात आली.
कोहलीने आपले मत व्यक्त केल्यावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अधिकारी यांनी रोहितला याबाबत विचारले. त्यावर रोहित म्हणाला की, " जर आयपीएमध्ये आमचा संघ बाद फेरीत गेला. त्यावेळी जर बुमरा फिट असेल तर त्याला खेळवणे आम्हाला भाग असेल. कारण तो संघाचा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यावर आमची काही समीकरणे अवलंबून असू शकतात. त्यामुळे एक कर्णधार म्हणून मी जेव्हा संघाचा विचार करतो, तेव्हा त्याला खेळवणे मला योग्य वाटते. "