Join us  

पाकविरुद्ध क्रिकेट थांबवून दहशतवाद संपणार आहे का? - बिशनसिंग बेदी 

पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबवून दहशतवाद संपुष्टात येणार आहे का? असा सवाल करीत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी क्रिकेटच्या राजकारणाआड...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 8:31 PM

Open in App

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबवून दहशतवाद संपुष्टात येणार आहे का? असा सवाल करीत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी क्रिकेटच्या राजकारणाआड काहीजण बेगडी देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे थांबायला हवे, असे आवाहन केले आहे. २०१२ पासून केंद्र शासनाने भारत-पाक क्रिकेट मालिकेला मंजुरी दिलेली नाही. डीडीसीएच्या कार्यक्रमानंतर यावर भाष्य करताना बेदी म्हणाले,‘क्रिकेट परस्परांना जोडण्याचे माध्यम आहे. क्रिकेट थांबविल्याने दहशतवाद थांबणार नाही. किस्तानविरोध म्हणजे देशभक्ती हे समीकरण बनले. हे योग्य नाही. भारत-पाक क्रिकेट सुरू करण्याची मागणी करतो त्यामुळे मी देशभक्त नाही का? मी भारतविरोधी आहे का? देशभक्तीची व्याख्या कृपया संकुचित करू नका.’

  • सध्याची भारत-श्रीलंका मालिका अर्थहीन -

बीसीसीआय हिटलरसारखा कारभार करीत असल्याने त्याच्या नावातील ‘नियंत्रण’ हा शब्द पुसलेला बरा, असे मत नोंदवित बेदी पुढे म्हणाले,‘भारतीय खेळाडू देशाचा तिरंगा वापरतात. ते देशासाठी खेळतात.’ सध्याची भारत-श्रीलंका मालिका अर्थहीन असून वारंवार का खेळत आहोत, हे देखील एक कोडे असल्याचे मत बेदी यांनी नोंदविले. 

  • बेदींकडून विराटचे कौतुक -

एक क्रिकेटपटू म्हणून मागील तीन-चार वर्षांत मी विराटकडून ज्या गोष्टी शिकलो त्या स्वप्नवत आहे. आजच्या पिढीने विराटकडून शिकण्याचे आवाहन करताना त्यांनी म्हटले की, विराट हा तुमच्यातील एक उदाहरण असून त्याने कायम क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. आम्ही क्रिकेट खेळत असताना नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून ही बाब शिकलो होतो.

  • व्यावसायिक क्रिकेटबद्दल काय म्हणाले बेदी - 

व्यावसायिक क्रिकेटपटूबद्दल बोलताना त्यांनी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची आठवण सांगितली. व्यावसायिक क्रिकेटपटू बनून खेळातून मिळणारा आनंद गमवायचा नसल्याचे सर डॉन ब्रॅडमन यांनी सांगितले होते. आपल्याला नेहमी प्रामाणिकपणासाठी ओळखले जावे असे ब्रॅडमन यांनी सांगितले असल्याचे बेदी यांनी सांगितले. यावेळी, बेदींनी सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना चिमटा काढला. अनेक क्रिकेटपटू रणजी, दिलीप ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात. मात्र, त्यानंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास नकार देत असल्याचे त्यांनी म्हटले. 

  • बेदी सरांचा ऋणी  - विराट कोहली 

50 शतकांच्या कामगिरीबद्दल बिशनसिंग बेदी यांच्या हस्ते विराटचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे सन्मानाची बाब असल्याचे विराटने म्हटले. ज्यावेळी १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील संघात खेळायचो तेव्हा कठीण आणि अवघड ट्रेनिंगमुळे आम्ही बेदी सरांपासून पळायचो. पण, आज फिटनेसचे महत्त्व मला कळाले असून त्यासाठी बेदी सरांचा ऋणी असल्याचे विराटने सांगितले.  

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटबीसीसीआयपाकिस्तान