मुंबई - आयपीएलदरम्यान केवळ कर्मचाऱ्यांसाठी व शौचालयासाठीच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. परंतु, याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी पाणीपुरवठा करणार का? अशी विचारणा न्यायालयाने महापालिकेकडे मंगळवारी करत यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
लोकसत्ता मुव्हमेंट या स्वयंसेवी संस्थेने २०१६ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती. त्यावेळी राज्यात दुष्काळ पडला असतानाही आयपीएल सामन्यांसाठी स्टेडियमच्या व खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाणी पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
गेल्या सुनावणीत महापालिकेने गेल्या तीन वर्षात वानखेडे स्टेडियमला विशेष पाणीपुरवठा करत नसल्याचे सांगितले होते, तर मंगळवारच्या सुनावणीत महापालिकेने ‘वानखेडे’ ला केवळ कर्मचाºयांसाठी व शौचालयासाठी पाणी पुरवठा करण्यात येत असून अन्य वापरासाठी पाणी पुरविले जात नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने यंदाही अशाच प्रकारे पाणीपुरवठा करण्यात येणार का? त्याव्यतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही ना, असा प्रश्न महापालिकेला केला. तसेच व्यावसायिक दराने आयपीएलसाठी पाणीपुरवठा करणार की नाही, हे ही स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले.
Web Title: Will Wankhede give extra water?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.