Womens T20 Challenge Final SUPERNOVAS vs VELOCITY : सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यातला महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंज स्पर्धेचा अंतिम सामना कमालीचा चुरशीचा झाला. १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीचा निम्मा संघ ६४ धावांत माघारी परतला होता. सुपरनोव्हाज संघाचा विजय निश्चित मानला जात होता. पण, व्हेलॉसिटिच्या लॉरा वोलव्हार्ड ( Laura Wolvaardt) आणि सिमरन बहादूर ( Simran Bahadur) यांनी अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. पण, त्यांना विजयापासून ४ धाव दूर रहावे लागले. डिएंड्रा डॉटिनच्या ( Deandra Dottin ) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सुपरनोव्हाजने तिसरे जेतेपद नावावर केले. डॉटिनने ६२ धावा चोपल्या आणि नंतर दोन विकेट्सही घेतल्या. हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) व अलाना किंग (Alana King) यांनीही आजच्या विजयात मोठा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून व्हेलॉसिटीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया ( Priya Punia ) , डिएंड्रा डॉटिन आणि हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) यांनी फटकेबाजी करताना अंतिम सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला. पुनिया ( २८) व डॉटिन यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. व्हेलॉसिटीच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले आणि त्याचा फायदा सुपरनोव्हाजने उचलला. डॉटीनने त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतसह ३६ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. डॉटिन ४४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर त्रिफळाचीत झाली.
अखेरच्या ५ षटकांत व्हेलॉसिटीने चांगले कमबॅक केले. त्यांनी पटापट विकेट घेतल्या. हरमनप्रीत २९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावा करुन बाद झाली. सुपरनोव्हाजने ७ बाद १६५ धावा कुटल्या. केट क्रॉस, दीप्ती शर्मा व सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीची सुरूवात खराब झाली आणि त्यांचा निम्मा संघ ६४ धावांत माघारी परतला. शेफाली वर्मा ( १५) व यास्तिका भाटीया ( १३) यांनी आक्रमक सुरुवात केली खरी, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. डॉटिनने तिच्या पहिल्याच षटकात शेफालीची विकेट घेतली आणि त्यानंतर सुपरनोव्हाजच्या गोलंदाजांनी विकेट्सची रांग लावली. पाच विकेट्समध्ये सोफी एकलेस्टनने दोन, डॉटिन, पूजा वस्त्राकर व अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
स्नेह राणा व लॉरा वोलव्हार्ड यांची ४० धावांची भागीदारी अलाना किंगने संपुष्टात आणली. स्नेह राणा ( १५) व राधा यादव ( ०) यांना सलग दोन चेंडूंवर किंगने माघारी पाठवून व्हेलॉसिटीचा पराभव निश्चित केला. केट क्रॉसने ७ चेंडूंत १३ धावा करताना चुरस निर्माण केली होती. डॉटिनने टाकलेल्या १७व्या षटकात ४ चेंडूंत क्रॉसने १२ धावा कुटल्या. पण, पाचव्या चेंडूवर डॉटिनने तिला बाऊन्सरवर बाद केले. वोलव्हार्डने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पदार्पणाच्या स्पर्धेतील तिचे हे दुसरे अर्धशतक ठरले. अलाना किंगने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. वोलव्हार्ड आणि सिमरन बहादूर यांनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. १२ चेंडूंत ३४ धावांची गरज असताना १९व्या षटकात त्यांनी १७ धावा चोपल्या. सिमरनने सलग तीन चौकार खेचले. त्यांना ६ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या.
सोफी एकलेस्टनच्या पहिल्याच चेंडूवर वोलव्हार्डने खणखणीत षटकार खेचला. २ चेंडूंत ७ धावा एवढा हा सामना चुरशीचा आला. वोलव्हार्डला पाचव्या चेंडूवर १ धाव करता आली. १ चेंडूत ६ धावा हव्या असताना एकलेस्टनने सुरेख चेंडू टाकला आणि सिमरनला १ धावेवर समाधान मानण्यास भाग पाडले. व्हेलॉसिटीला १६१ धावाच करता आल्या आणि सुपरनोव्हाजने ४ धावांनी हा सामना जिंकला. वोलव्हार्ड व सिमरन यांनी १९ चेंडूंत नाबाद ४४ धावांची भागीदारी केली.
Web Title: Womens T20 Challenge Final SNO vs VEL : 3rd title for Supernovas in Women's T20 challenge, but what a fight by Laura Wolvaardt and Simran Bahadur
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.