सिडनी: आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा सलामीच्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने दीप्ती शर्माच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर 20 षटकात 132 धावा केल्या आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 133 धावांचा पाठलाग करवा लागणार आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. भारताने चार षटकांमध्ये 41 धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासेनने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना 10 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
आपला पहिला ट्वेंटी- 20 विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. तिने धमाकेदार खेळी करत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला, पण 15 चेंडूत 29 धावा करून ती बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला शफालीला झेलबाद करण्यात यश आले.
भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर देखील फक्त 2 धावा करत यष्टीचीत झाली. यानंतर दिप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेमिमाला डेलिसा किमिन्सेने पायचीत केले. जेमिमाने 33 चेंडूत 26 धावा केल्या. त्यामुळे दीप्ती शर्मा आणि जेमिमाच्या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, पूनम यादव.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), अॅश्ले गार्डनर, रॅचेल हेन्स, अॅलिसा हेली, जेस जोनासेन, डेलिसा किम्मिन्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, मॉली स्टॅन्रो.