Join us  

महिला कसोटी : भारतावर फॉलोऑनची नामुष्की; पावसाच्या व्यत्ययात इंग्लंडचे वर्चस्व

तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव २३१ धावात संपुष्टात आला. त्यामुळे यजमान संघाने फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:49 AM

Open in App

ब्रिस्टल : भारतीय महिला संघाला शुक्रवारी येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव २३१ धावात संपुष्टात आला. त्यामुळे यजमान संघाने फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला. 

भारताने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला त्यावेळी दुसऱ्या डावात १ बाद ८३ धावांची मजल मारली होती. त्यावेळी अर्धशतक झळकावणाऱ्या शेफाली वर्माला (नाबाद ५३) दीप्ती शर्मा (नाबाद १८) साथ देत होती. त्यावेळी भारतीय संघ ८२ धावांनी पिछाडीवर होता. इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केल्यानंतर भारतावर १६५ धावांची आघाडी मिळवली. 

गुरुवारी दुसऱ्या दिवशी १७ वर्षीय शेफाली वर्मा (९६) व स्मृती मानधना (७८) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर भारताने एकापाठोपाठ पाच विकेट गमावल्या. शुक्रवारी भारताने ५ बाद १८७ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्याच धावसंख्येवर भारताने दोन विकेट गमावल्या. एका टोकाला दीप्ती शर्मा कायम होती, पण दुसऱ्या टोकाकडून तिला योग्य साथ लाभली नाही. भारताने आज २१.२ षटकांत ५ गडी गमावत ४४ धावांची भर घातली. दीप्ती शर्मा २९ धावा काढून नाबाद राहिली. पूजा वस्त्राकरने १२ धावांचे योगदान दिले. या दोघींनी नवव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली, पण भारताला फॉलोऑन टाळण्यात अपयश आले.संक्षिप्त धावफलकइंग्लंड पहिला डाव ९ बाद ३९६ (डाव घोषित). भारत पहिला डाव ८१.२ षटकात सर्वबाद २३१ (शेफाली वर्मा ९६, स्मृती मानधना ७८, दीप्ती शर्मा नाबाद २९, पूजा वस्त्राकर १९, एक्लेस्टोन ४-८८, नाईट २-७, ब्रंट, स्किवर, श्रबसोल व क्रॉस प्रत्येकी एक बळी).