कोलंबो : श्रीलंकेच्या अँजेलो परेराने एका सामन्यात एकाच खेळाडूनं दोन द्विशतकं ठोकण्याचा दुर्मिळ पराक्रम सोमवारी केला. 2013 ते 2016 या कालावधीत श्रीलंकेच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाज परेराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम केला. कोलंबो येथील सिन्हालेसे स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात परेरा नॉडेंस्क्रिप्ट्स सीसी संघाचे नेतृत्व करत होता आणि श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी प्रीमिअर लीगच्या टायर A गटातील एसएससी संघाविरुद्ध त्याने ही अविश्वसनीय खेळी साकारली.
28 वर्षीय परेराने पहिल्या डावात 203 चेंडूंत 201 धावा चोपल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 268 चेंडूंत 231 धावा केल्या. त्याच्या या खेळी व्यतिरिक्त दोन्ही संघांतील एकूण तीन फलंदाजांनी शतकी खेळी साकारली. चार दिवसांच्या या सामन्यात एकूण 26 विकेट्स गेल्या. परेराच्या संघाला या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.
परेराकडे 97 प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47.54 च्या सरासरीनं 18 शतकी खेळी करताना 6941 धावा केल्या आहेत. परेराने एकाच सामन्यात दोन द्विशतकं झळकावून 80 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1938 मध्ये इंग्लंडच्या ऑर्थर फेग यांनी केंट्स क्लबकडून खेळताना एसेक्सविरुद्ध एकाच सामन्यात दोन द्विशतकं केली होती. फेग यांनी 244 आणि नाबाद 202 धावा केल्या होत्या.
Web Title: WOW: Sri Lanka’s Angelo Perera completes rare ‘double double’, equaling the rare record of 80 years old
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.