साउथम्पटन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान बहुप्रतीक्षित विश्व कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यामुळे ही लढत गरज भासली तर राखीव दिवस म्हणजेच सहाव्या दिवसापर्यंत खेळली जाईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) डब्ल्यूटीसी फायनलसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांनुसार गरज भासली तर सहाव्या दिवशीही खेळ होईल. कारण पहिल्या दिवशीच सहा तासांचा खेळ वाया गेला आहे. पाऊस व वादळाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. सर्वत्र पाणी साचल्यामुळे मैदान निसरडे झाले होते. मैदान कोरडे करण्याची चांगली व्यवस्था असतानाही पहिल्या दिवसाचा खेळ शक्य झाला नाही. पंच मायकल गॉ आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी अनेकदा मैदानाचे निरीक्षण केल्यानंतर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता) पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
साउथम्पटनच्या निवडीवर प्रश्नचिन्हसाउथम्पटनची फायनलचे स्थळ म्हणून निवडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पण आयसीसी व इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) सामन्याच्या स्थळ निश्चित करण्यापूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डला (बीसीसीआय) विश्वासात घेतल्याचे वृत्त आहे.
...तरी फायनल रंगतदार होणारइंग्लंडने गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या ३२ कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषविले आहे आणि त्यातील केवळ चार सामने अनिर्णीत संपले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द झाला असला तरी फायनल रंगतदार होण्याची शक्यता आहे. आता शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता (स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० पासून ) खेळ सुरू होईल. इंग्लंडमध्ये वातावरणात बदल होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे अन्य दुसऱ्या स्थळावर सामन्याचे आयोजन करण्यात आले असते तरी पाऊस येणार नाही, याची हमी देता आली नसती.
क्रिकेट नको, जलतरण स्पर्धा घ्या! आयसीसी ट्रोल...आयसीसीला इतका महत्त्वाचा सामना साउथम्पटनमध्ये घेण्याची गरज काय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नेटकरी इतक्यावर न थांबता या सामन्याला विलंब झाल्यामुळे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केले. भारतीय चाहत्याने लिहिले, ‘समुद्राच्या तळाशी क्रिकेट खेळवा!’ पाकिस्तानच्या एका चाहत्याने भिंतीवर चढून खिडकीत डोकावत असल्याचे छायाचित्र शेअर केले, त्यावर लिहिले,‘ बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’! एकाने विराट पावसात पोहून धाव घेत असतानाचा फोटो शेअर केला. अन्य एका यूजरने सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी विराट आणि विलियम्सन यांनी उचलून पुराच्या पाण्यातून वाट काढत नाणेफेकीसाठी मैदानात नेत असल्याचा फोटो शेअर केला.लहान मुलगा ढसढसा रडताना, काही व्यक्ती ‘ए क्या श्रीमान?’अशी विचारणा करताना तसेच खेळपट्टीवर गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाले असताना विराट आणि विलियम्सन हे नाणेफेक करीत असल्याचे दिसत आहे.