कोलंबो: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यातून निवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. आगामी बांगलादेश विरुद्ध होणारी वनडे मालिका लसिथ मलिंगासाठी शेवटची असणार आहे. बांगलादेश विरुद्ध तीन सामन्यांची ही मालिका असणार आहे. मात्र, या तीनपैकी पहिल्याच सामन्यात लसिथ मलिंगा खेळणार आहे. त्यानंतर लसिथ मलिंगा आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यातून निवृत्ती घेणार आहे. याबाबतची माहिती श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करुणरत्ने यांने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
लसिथ मलिंगाने आपल्या करिअरमध्ये 225 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 335 बळी घेतले आहे. वनडे सामन्यात 6/38 अशी उत्तम कामगिरी त्याने केली आहे. तसेच, आपल्या करिअरमध्ये 11 वेळा एका सामन्यात 4 बळी घेतले आहेत. तर 8 वेळा 5 बळी घेण्याचा मान लसिथ मलिंगाने पटकाविला आहे.
दरम्यान, विश्वचषक संपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अनेक संघातील दिग्गज खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचेही नाव चर्चेत आहे.