कोलंबो : श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार लसीथ मलिंगाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला, तसेच जगभरात यॉर्करकिंग म्हणून नावाजला गेलेल्या मलिंगाने ट्विटरवरून ही घोषणा केली. ३८ वर्षांच्या मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने २०१४च्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते.
आपल्या ट्विटमध्ये मलिंगा म्हणाला की, ‘टी-२० क्रिकेटसोबतच माझा सर्वप्रकारच्या क्रिकेटला अलविदा. या संपूर्ण यात्रेत ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचा मी आभारी आहे. आगामी काळात तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रयत्नरत असेल.’ आगामी टी-२० चषकासाठी संघात निवड न झाल्याने मलिंगाने निवृत्तीचा मार्ग स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे. मलिंगाने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हॅट्ट्रिक आहेत. त्याने तीन वेळा वनडे, तर दोन वेळा टी-२० मध्ये अशी कामगिरी केली होती. सलग चार चेंडूवर चार बळी घेण्याची कामगिरी त्याने दोन वेळा केली आहे. आपल्या विचित्र बॉलिंग ॲक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कसोटीत १०१, एकदिवसीय सामन्यात ३३८, तर टी-२० मध्ये १०७ बळी घेतले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर आहे. त्याने २००८ ते २०१९ या काळात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतांना १२२ सामन्यात १७० बळी घेतले. आयपीएलचे सर्वाधिक चार वेळा मुंबईला जेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. सततच्या दुखापतीमुळे मलिंगाने २०११ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मर्यादित षटकांमधला भेदक गोलंदाज म्हणून मलिंगा ओळखला जायचा.
- निवृत्तीनंतर लसिथ मलिंगा कोचिंगच्या भूमिकेत दिसू शकतो. मलिंगा टी-२० क्रिकेटमधल्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असल्याने त्याचे मार्गदर्शन उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी मोलाचे ठरू शकते. जगभरातील २९ संघांसोबत खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.