मुंबई : भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा यंदा वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरला आहे, पण कोविड-१९ महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याच्या फिटनेस चाचणीला उशीर होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान रोहित २ फेब्रुवारीला दुखापतग्रस्त झाला होता आणि दौरा अर्धवट सोडून त्याला मायदेशी परतावे लागले होते. रोहितने शनिवारी ला लीगाच्या फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान म्हटले की,‘लॉकडाऊनपूर्वीच मी पुनरागमनासाठी जवळजवळ पूर्णपणे सज्ज झालो होतो. पूर्ण आठवडाभर माझी फिटनेस चाचणी होणार होती, पण त्यानंतर लॉकडाऊन झाले आणि आता पुन्हा नव्याने पुनरागमन करावे लागेल.’ तो पुढे म्हणाला,‘सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर मला एनसीएमध्ये जाऊन फिटनेस चाचणी द्यावी लागेल. त्यात यशस्वी ठरल्यानंतरच मला संघासोबत जुळता येईल.’
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर कोरोना व्हायरसमुळे दोन महिन्याच्या ब्रेकनंतर शनिवारी आऊटडोअर सराव पुन्हा सुरू करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. महाराष्ट्र सरकारने ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना वैयक्तिक सरावाला परवानगी दिली आहे. रोहितने म्हटले की,‘संघातील सहकाऱ्यांसोबत वेळ न घालविण्याची उणीव भासत आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर तो त्यांच्यासोबत पुन्हा सराव करण्यासाठी उत्सुक आहे.
मला माझ्या संघ सहकाºयांची उणीव भासत आहे. त्यांच्यासोबत वेळ घालविणे आणि त्यांच्यासोबत करमणूक करण्याची संधी मिळत नाही. दरम्यान, आम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहोत.’कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
रोहित म्हणाला,‘मला सरावाला पुन्हा सुरुवात करण्यास वेळ लागू शकतो. मुंबईच्या तुलनेत अन्य स्थळांवर लवकर सरावाला सुरुवात होऊ शकते, असे मला वाटते. कारण येथे कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. माझ्या तुलनेत अन्य सहकारी सरावाचे व्हिडिओ माझ्यापूर्वी शेअर करतील, असे मला वाटते. लॉकडाऊनदरम्यान मी आहार व फिटनेसवर लक्ष दिले.’