- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...पराभवातून धडा घेत दमदार मुसंडी मारणारी कामगिरी भारताने न्यूझीलंड दौऱ्यात दुस-यांदा केली आहे. दुस-या टी२० त शानदार विजयाचा पाया गोलंदाजांनी रचला. त्यावर तडाखेबाज फटकेबाजी करीत फलंदाजांनी विजयी कळस चढविला.पहिल्या सामन्याच्या तुलनेत आॅकलंडमध्ये गोलंदाजांची मानसिकता अधिक आक्रमक आणि सकारात्मक होती. टी२० फलंदाजांचा खेळ असेलही पण शुक्रवारी गोलंदाजांनी जी कामगिरी केली, तो हा समज खोटा ठरविणारा मोठा पुरावा ठरला. कृणाल पांड्याचे चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजांवर आघात करणारे होते. फलंदाजांना चकविणारा तो पारंपरिक डावखुरा फिरकीपटू निश्चितच नाही पण क्रीजचा योग्य वापर करीत त्याने ज्या कोपºयातून वैविध्यपूर्ण मारा केला तो फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा होता. कॉलिन मुन्रो आणि केन विलियम्सन यांना त्याने ज्याप्रमाणे चकविले, ते पाहून मी फारच प्रभावित झालो. माझ्या मते, कृणाल पाचव्या स्थानापासून पुढे कुठल्याही स्थानावर फलंदाजी करू शकत असल्याने, तो अष्टपैलू खेळाडू आहे. प्रभावी गोलंदाजीसोबत त्याने आयपीएलमध्ये धावांचे योगदान देत अनेक सामने जिंकून दिले आहेत. गोलंदाज म्हणून त्याची वाटचाल ही सकारात्मक प्रगती मानायला हवी.रोहितने विजयी लक्ष्य गाठताना नेत्रदीपक खेळी केली. चांगल्या चेंडूवरही तो धावा काढू शकतो, हे त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य ठरत असल्यामुळेच टी२० त सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरू शकला.पहिल्या टी२० नंतर अनेक बदल अपेक्षित होते. पण व्यवस्थापनाने नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास कायम राखला. खेळाडूंना एकप्रकारची सुरक्षा व आत्मविश्वास मिळाल्याने त्यांनीदेखील भीतीची तमा न बाळगता बिनधास्त खेळ केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोलंदाजीत खलील अहमद आणि फलंदाजीत ऋषभ पंत तसेच विजय शंकर यांनी केलेली कामगिरी ठरली. तिसºया आणि अखेरच्या टी२० सामन्यात धावांचा पाऊस मला अपेक्षित आहे. रोहित आणि त्याचे सहकारी विजयी धडाका कायम राखून प्रेक्षणीय कामगिरी करतील, यात शंका नाही.