देशात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळी मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानंही पुढाकार घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली की रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. याच महत्वाच्या मुद्द्यावर युवराज सिंग यानं काम करायचं ठरवलं आहे.
देशातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण १ हजार बेड्स वाढविण्याचा निर्धार युवराज सिंगनं केला असून त्याच्या 'यू व्ही कॅन' (YouWeCan) या सामाजिक संस्थेकडून हे प्रयत्न केले जाणार आहेत. यातील पहिलं पाऊल देखील युवराज सिंगच्या संस्थेनं टाकलं आहे. इंदौरमधील एमजीएम रुग्णालयाला पत्र पाठवून युवराज सिंगच्या संस्थेनं रुग्णालयात १०० बेड्स वाढविण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालय प्रशासनानंही युवराजच्या पुढाकाराचं कौतुक करत परवानगी दिली आहे. येत्या २० ते ३० दिवसांत इंदौरच्या एमजीएम रुग्णालायत कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आणखी १०० बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यात सर्व बेड्सहे ऑक्सिजन बेड्स असणार आहेत. त्याशिवाय यातील १० टक्के बेड्स वेंटिलेटर बेड्स असणार आहेत.
"कोरोना काळात अनेकांनी आपली जवळची व्यक्ती गमावली आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर आवश्यक सुविधांसाठी असंख्य लोकांना कठीण प्रसंगांना सामोरं जाताना पाहिले आहे. यावरुन मी खूप अस्वस्थ झालो आणि आपण आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या लोकांना तसेच केंद्र व राज्य सरकारांना मदत करायला पुढे आलो पाहिजे ही भावना निर्माण झाली", असं युवराज सिंग म्हणाला.