मुंबई इंडियन्सच्या जोसेफचा धुमाकूळ, वेस्ट इंडिजचा वंडर बॉय!

आयपीएलमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या अल्झारी जोसेफने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली.

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अल्झारीने पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली. त्याने 12 धावांत 6 बळी घेतले. आयपीएलमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

हा विक्रम सोहेल तन्वीरच्या नावावर होता. तन्वीरने 2008मध्ये 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम १२ वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता.

आयपीएलमधील पदार्पणातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. अँड्य्रू टाय याच्यानंतर ( 5/17) पदार्पणात पाच विकेट घेणारा अल्झारी हा दुसरा गोलंदाज ठरला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजाने नोंदवलेली ही आठवी सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रमावारीत लसिथ मलिंगा ( 6/7, 2012), कायले जेमीएसन ( 6/7, 2019), फाफामा फोजेला ( 6/9, 2014) हे अव्वल तिघांत आहेत.

आशिया खंडात ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी श्रीलंकेच्या अजंठा मेंडिसने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 8 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारा अल्झारी हा वेस्ट इंडिजचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

दुखापतग्रस्त वेगवाग गोलंदाज अॅडम मिलनेच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जोसेफच्या देशप्रेमाची प्रचिती आली होती. जोसेफ आईच्या निधनानंतर काही कालावधीतच सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर परतला.