T20 World Cup 2022: 3 दुखापतग्रस्त तर एकाचं चुकलं विमान! हे 4 स्टार खेळाडू टी-20 विश्वचषकातून झाले बाहेर

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकापूर्वी काही स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले आहे. खरं तर वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूला विमान चुकल्यामुळे विश्वचषकाला मुकावे लागले.

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराहने मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले. तो आशिया चषकात देखील भारतीय संघाचा हिस्सा नव्हता. बीसीसीआयने अद्याप त्याच्या रिप्लेसमेंटवर कोणतेही नाव जाहीर केले नाही. खरं त्याच्या जागी मोहम्मद शमी किंवा दीपक चहर यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच विश्वचषकातून बाहेर झाला आहे. जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून गुडघ्याच्या समस्येचा सामना करत होता. आशिया चषक 2022 च्या मध्यातूनच तो संघाबाहेर झाला होता, त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. जडेजा बाहेर पडल्यानंतर अक्षर पटेलला संघात संधी मिळाली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते.

इंग्लंडच्या संघाचा घातक यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो देखील या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. बेअरस्टोची इंग्लंडच्या टी-20 विश्वचषक संघात निवड झाली होती, परंतु संघ जाहीर झाल्यानंतर तो गोल्फ खेळताना जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. बेअरस्टोच्या जागी सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला.

वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर देखील विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विमान चुकले म्हणून त्याला स्पर्धेला मुकावे लागले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याला दोनदा ऑस्ट्रेलियाचे विमान चुकवल्यामुळे टी-20 विश्वचषक संघातून वगळले आहे. त्याच्या जागी 34 वर्षीय फलंदाज शामराह ब्रूक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.