Suresh Raina MS Dhoni, IPL 2022 CSK vs PBKS: महेंद्रसिंग धोनी आज करू शकतो मोठा विक्रम; सुरेश रैनाला मागे टाकण्याची संधी

धोनी आणि रैना दोघांच्याही नावावर आहेत बरेच विक्रम पण...

Suresh Raina, MS Dhoni: IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) ची सुरुवात खूपच खराब झाली. हंगामातील पहिले दोन्ही सामने त्यांना गमावले. IPL च्या इतिहासात चेन्नईच्या संघाने पहिले दोन्ही सामने पराभूत झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

यंदा पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनी ऐवजी रविंद्र जाडेजा संघाचा कर्णधार आहे. तरीदेखील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला धोनी वेळोवेळी जाडेजाला सल्ला देताना दिसतो.

चेन्नई संघाचा तिसरा सामना आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात धोनीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. इतकेच नव्हे तर सुरेश रैनाचा Suresh Raina विक्रम मोडीत काढण्याची संधी त्याच्याजवळ आहे.

महेंद्रसिंग धोनीने चेन्नई संघाकडून खेळताना IPL मध्ये १९१ षटकार मारले आहेत. तर चॅम्पियन्स लीग मधील CSKचे सामने पकडून एकूण २१७ षटकार खेचले आहेत.

CSK साठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत धोनीचे पुढे आता फक्त सुरेश रैना आहे. त्याच्या नावावर CSKतर्फे एकूण २१९ षटकार आहेत. हा विक्रम मोडण्याची संधी आज धोनीकडे आहे.

धोनीने आजच्या सामन्यात ३ षटकार मारले तर तो सुरेश रैनालाही मागे टाकेल. अशा प्रकारे धोनी CSKकडून खेळताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत अव्वल ठरेल.

कोणत्याही एका संघासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सध्या धोनी नाहीये. कोणत्याही एका संघासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल अव्वल आहे. त्याने RCB तर्फे २६३ षटकार ठोकले आहेत.

त्याच्यापाठोपाठ मुंबई इंडियन्ससाठी २४९ षटकार मारणारा किरॉन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. RCB साठी २४० षटकार ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली RCB तर्फे २२६ षटकार ठोकून चौथ्या स्थानी आहे.

आजच्या सामन्यात जर धोनीने रैनाला मागे टाकले तर तो पाचव्या क्रमांकावर विराजमान होईल. सध्या या स्थानी सुरेश रैना आहे. पण रैना आता IPL खेळत नसल्याने धोनीकडे त्याला मागे टाकण्याची संधी आहे.