रोहित शर्मासाठी कोणता नंबर ठरलाय लकी?; टेस्टमध्ये कोणत्या क्रमांकावर कशी राहिलीये कामगिरी

रोहित शर्मानं कोणत्या क्रमांकावर केली सर्वात भारी बॅटिंग; कोणत्या क्रमांकावर पदरी आली सर्वाधिक निराशा? इथं पाहा रेकॉर्ड

वनडे असो वा कसोटी गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा सातत्याने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पिंक बॉल टेस्टसाठी मात्र आपला ओपनिंगचा स्लॉट त्याने लोकेश राहुलसाठी मोकळा केला आहे. खुद्द रोहित शर्माने यासंदर्भातील माहिती दिलीये.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ‍ॅडिलेडच्या मैदानात रंगणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये रोहित शर्मा हा डावाची सुरुवात करण्याऐवजी मध्यफळीत खेळताना दिसणार आहे. आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत तो पहिल्या क्रमांकापासून ते अगदी सहाव्या क्रमांकावरही बॅटिंगला आल्याचे पाहायला मिळाले आहे.

इथं एक नजर टाकुयात बॅटिंग ऑर्डरमधील बदलाच्या खेळात कोणत्या क्रमांकावर त्याने कशी कामगिरी केलीये? कोणता क्रमांक त्याच्यासाठी लकी ठरलाय अन् कोणत्या क्रमांकावर तो सर्वात फ्लॉप ठरला यासंदर्भातील रेकॉर्ड्सवर

२०२१ ते २०२४ पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना २९ डावात रोहित शर्मानं ४३.७८ च्या सरासरीनं १२२६ धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश असून १६१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

२०१९ ते २०२४ या कालावधीत दुसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना रोहित शर्मानं ३५ डावात ४४.२१ च्या सरासरीनं १४५९ धावा केल्या आहेत. यात ६ शतकांसह ३ अर्धशतकांचा समावेश असून २१२ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

२०१५ मध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसला. एका अर्धशतकासह २१.४० च्या सरासरीने त्याने या क्रमांकावर खेळताना ५ डावात १०७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. ५३ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

२०१५ मध्ये एका डावात तो चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसला होता. यावेळी त्याने फक्त चार धावांची खेळी केली होती.

२०१३ ते २०१८ या कालावधीत पाचव्या क्रमांकावर खेळताना १६ डावात त्याने २९.१३ च्या सरासरीसह ४३७ धावा केल्या आहेत. ३ अर्धशतकांमधील ७९ धावा ही त्याची या क्रमांकावरील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

२०१३ ते २०१८ या कालावधीत सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने २५ डावात ५४.५७ च्या सरासरीनं १०३७ धावा काढल्या आहेत. यात ३ शतकांसह ६ अर्धशतकांचा समावेश असून १७७ ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.