Team India New Jersey, BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट संघ लवकरच एका नव्या रुपात दिसणार आहे. टीम इंडियाचा रंग तोच राहणार आहे, पण त्याची शैली बदलली आहे. टीम इंडियाच्या जर्सीच्या लूकमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी टीम इंडियाची नवीन वनडे जर्सी लाँच केली. BCCI चे सचिव जय शाह यांनी मुंबईतील बोर्डाच्या कार्यालयात संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थित होती. टीम इंडियाची ही जर्सी जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी Adidas ने बनवली आहे.
नवीन जर्सीमध्ये विशेष काय?
टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर तीन Adidas लोगोचे पट्टे होते. विश्वचषकादरम्यान ते पट्टे तिरंग्याच्या रंगाचे करण्यात आले होते. नव्या जर्सीमध्येही खांद्यावर आदिदास लोगोचे तीन पट्टे आहेत, ज्यांचा रंग पांढरा आहे. त्यासह खांद्याच्या भागाला तिरंग्याची शेड देण्यात आली आहे. त्यावर तीन पट्टे लावण्यात आले आहेत. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा थोडा फिकट आहे, पण बाजूने हा रंग गडद करण्यात आला आहे.
नवी जर्सी कधीपासून वापरली जाणार?
टीम इंडियाची ही जर्सी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा वापरली जाणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असून तेथे वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेदरम्यान टीम इंडिया पहिल्यांदा ही जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. मात्र ही जर्सी केवळ महिला संघासाठी नाही, तर पुरुष संघ देखील ही जर्सी परिधान करताना दिसणार आहे. भारतीय पुरुष संघ जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा या जर्सीत दिसणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया या जर्सीत दिसणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकादरम्यानही टीम इंडिया या जर्सीत दिसू शकते.
Web Title: Team India has launched a new ODI jersey, there has been an important change near the shoulders, see the photos of the launch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.