बलात्काऱ्याला १० वर्षे कारावास : नागपूर जिल्ह्यातील केळवदमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 09:52 PM2020-01-30T21:52:49+5:302020-01-30T21:54:55+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना केळवद पोलिसांच्या हद्दीतील आहे.
रोशन खेमराज मोहतकर (२२) असे आरोपीचे नाव असून तो तिडंगी, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी सात वर्षे वयाची होती. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. १४ डिसेंबर २०१२ रोजी आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले व तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी एफआयआर नोंदवला व आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले.