लाखो रुपयांचे आमिष दाखवून 104 महिलांना लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:06 PM2019-10-30T21:06:00+5:302019-10-30T21:07:51+5:30
नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरातील 104 महिलांना उद्योगपती महिलांच्या रॅलीमध्ये जाण्यासाठी नोंदणी करून प्रत्येकी हजारो रुपये घेऊन लाखो रुपयांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तर 62 महिलांना बनावट 15 लाखांचे डीडी बनवून देतही फसवणूक केल्याने खळबळ माजली आहे. फसवणूक झालेल्या महिलांच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे यार्ड जवळील यशवंत गौरव मधील शितलदीप अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/403 मध्ये राहणारी हेमा रवींद्र परब उर्फ नीलिमा अजित जाधव (43) यांनी डिसेंबर 2017 मध्ये यांच्यासह 103 महिलांनी आरोपी मुकरम अली मोहम्मद अन्सारी याने उद्योगपती महिलांच्या रॅलीमध्ये जायचे त्यासाठी नोंदणी व इतर प्रोसेसिंग करण्यासाठी प्रत्येकीकडून 35 हजार रुपये रोखीने घेतले. त्यानंतर तुम्हाला प्रत्येकीला 15 लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून 15 लाखांचे बनावट दिल्ली येथील बँकेचे 62 डीडी बनवून दिले. तसेच एमयूओ साठी हेमा यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन गेला. 104 महिलांना त्यांनी दिलेली रक्कम किंवा ठरलेली रक्कम परत न करता ऐकून 41 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
लाखो रुपये परत मिळतील असे आमिष दाखवून तब्बल 104 महिलांची फसवणूक केली आहे. तक्रार आल्यावर योग्य ती चौकशी करून आरोपी बाबत गुन्हा दाखल केला आहे. - वसंत लब्दे (पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)