मुंब्य्रातून ११ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 04:01 AM2020-11-19T04:01:27+5:302020-11-19T04:01:39+5:30
मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहूब वाटणारा परंतु, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून त्यांची विक्री करणारे मुजमिल साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा), मुजफ्फर पावसकर (४१, अंधेरी, मुंबई), प्रवीण परमार (४३, साकीनाका, मुंबई) आणि नसरीन काझी (४१, रा. मुंब्रा) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहूब वाटणारा परंतु, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. या आधारे कोथमिरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, संजय भिवणकर आदींच्या पथकाने सापळा लावून मुजम्मील सुर्वे याच्यासह चौघांना १८ नोव्हेंबर रोजी ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटांसह अटक केली. या चौकडीकडे मिळालेल्या एका बॅगेमध्ये ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत.
कर्जपरतफेडीसाठी ‘उद्योग’
लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यामुळे सुरुवातीला परमार आणि मुजफ्फर यांनी १० रुपयाची नोट एका प्रिंटरवर छापून ती वटविली. नंतर दोन हजारांच्या नोटेची त्यांनी अशीच पडताळणी केली. त्यांनी १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या. त्यातील ४५ हजार रुपये वटविल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून २०० रुपयांच्या १५, ५०० च्या ९४८, तर दोन हजारांच्या ३३६ बनावट नोटा हस्तगत केल्या. चौघांनाही २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.