नोकरीचे आमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:00 PM2019-11-20T22:00:46+5:302019-11-20T22:00:58+5:30
समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
अमरावती : समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. रवींद्र खंडारे, अंकुश सावळकर यांच्यासह अन्य पाच जणांचा आरोपींमध्ये सहभाग आहे.
पोलीस सूत्रानुसार, गोकुल मुकुंद खंडारे (२५, रा. दोनद, बार्शिटाकळी, जि.अकोला) याला नातेवाईक असणारा रवींद्र खंडारे यांने समाज कल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी गोकुलने शेती विकून रवींद्रला प्रथम ५ लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांत वडाळी परिसरात आणखी ६ लाख रुपये दिले.
दरम्यान आरोपींनी संगनमत करून गोकुल खंडारेला नोकरीची बनावट आर्डरसुद्धा दिली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे कळताच गोकुल खंडारे याने बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१, १२० ब, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी करीत आहेत.