लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी शांतिनगर येथे सुरू असलेल्या कुख्यात पप्पू यादव याच्या मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे अवैध धंद्यांशी संबंधित गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींची नावे गणेश कोलबाजी वेडेकर, सीताराम विश्वनाथ वनकर, नरेश परसराम नाग, आनंद दौलतराम ठाकूर, खुशाल पुनाजी बारापात्रे, शेख फारूख शेख मेहमूद, तेजराम महादेव देवघरे, योगेश हरीलाल जवेरी, शुभम आदुराम वर्मा, आशिष लक्ष्मण डांगे, प्रवीण अनंतराम जोशी, प्रशांत सुरेश खोडे आणि चैतन्य प्रभाकरराव जैन अशी आहेत.पप्पू यादव अनेक वर्षांपासून शांतिनगरातील भारती आखाड्याजवळ मटका व जुगार अड्डा चालवित होता. तो चर्चित अशोक यादव ऊर्फ बावाजीचा भाऊ होय. पप्पूच्या अड्ड्यावर नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. त्याला स्थानिक पोलिसांचाही आश्रय आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई होत नव्हती. गुन्हे शाखेला याची माहिती होताच पोलिसांनी बुधवारी तिथे धाड टाकली. पोलिसांना पाहून आरोपी पळू लागले. घेराबंदी केल्याने १३ आरोपी हाती लागले. पप्पू यादव मात्र पळून गेला. पकडल्या गेलेल्या आरोपींजवळून मोबाईल, दुचाकीसह ३ लाख १६ हजार रुपयंचा माल जप्त करण्यात आला.ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विनोद चौधरी, एपीआय पंकज धाडगे, योगेश चौधरी, रफीक खान, हवालदार प्रशांत लाडे, अनिल दुबे, शैलेश पाटील, अनूप साहू, अरुण धर्मे, टप्पूलाल चुटे, प्रवीण गोरटे, फिरोज खान आणि राजू पोद्दार यांनी केली.