फेसबुकद्वारे १३ महिलांना गंडा, भामट्यास अटक : १५ लाखांची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 03:37 PM2021-02-05T15:37:37+5:302021-02-05T15:37:52+5:30
फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (३६, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली.
ठाणे : फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (३६, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. त्याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्यभरातील १३ महिलांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सतीशने फेसबुक अकाउंटवर आकर्षक दिसणाऱ्या तरुणाचे छायाचित्र लावून कल्याणमधील एका ३५ वर्षीय विवाहितेशी मैत्री केली. त्यासाठी त्याने फेसबुकवर शुभम पाटील या नावाचा वापर केला. तिच्याशी फेसबुकवर संवाद साधत तिच्याकडून त्याने तीन लाख १९ हजारांची रक्कम ऑनलाइनद्वारे घेऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी २९ डिसेंबर २०२० ला बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तिने तक्रार केली.
मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अंकुश शिंदे यांनी शुभम पाटील या नावाने फेसबुकवर खाते उघडणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची माहिती काढली. त्या वेळी हा मोबाइल घणसोली रेल्वे स्थानक परिसरातील असल्याचे समजले; परंतु हा मोबाइल सतीश मोरे याचा असून, तो घणसोली स्थानक परिसरात फिरत असल्याचेही उघड झाले.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, प्रदीप भोईर आणि जमादार श्यामराव कदम आदींच्या पथकाने २ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घणसोली स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सतीशने आपण फेसबुकवर शुभम पाटील आणि सोनू पाटील या नावाने अकाउंट सुरू केल्याचे सांगितले. त्याने अशाच प्रकारे १३ महिलांची १५ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची कबुली दिली. स्वत:ची ओळख लपवून तो फेसबुकवर मैत्री केलेल्या महिलांशी संवाद साधत असल्याचे तपासातून समोर आले.
पोलीस कोठडीत रवानगी
n कल्याण, भिवंडी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, वसई, महाड, भायखळा, नेरूळ, पुणे, अमरावती, सातारा आणि रत्नागिरी आदी परिसरातील महिलांची त्याने अशाच प्रकारे गेल्या दोन वर्षांत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे.