औरंगाबादेत नोकरीचे आमिष दाखवून महिला पोलिसाकडून १४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 06:26 PM2018-08-23T18:26:44+5:302018-08-23T18:27:19+5:30
याप्रकरणी तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिला पोलीस कर्मचारी छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
औरंगाबाद : बँकेत शिपाईपदाची नोकरी लावते, अशी थाप मारून महिला पोलीस कर्मचारी, पती आणि सवतीने तिघांना १४ लाख ५० हजाराला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिला पोलीस कर्मचारी छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
कन्नड तालुक्यातील वडाळी येथील सुनील अशोक गवळे यांचे शिक्षण ११ वीपर्यंत झाले आहे. सुनीलचा भाऊ राजेंद्र औरंगाबादेत म्हाडा कॉलनीत राहतो. २०१४ मध्ये सुनीलही राजेंद्रकडे राहण्यास होता. त्यावेळी त्याची ओळख शेख जाफर शेख उस्मान (रा. पोलीस कॉलनी, मिलकॉर्नर) याच्याशी झाली. त्यावेळी जाफर याने आपली बँकेत अनेक अधिकाऱ्यांशी ओळख असून, शिपाई म्हणून कायमस्वरुपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर दिनेश राठोड नावाच्या तरुणालाही आपणच नोकरी लावून दिली, असेही सांगितले. बँकेत शिपाईपदावर कायमस्वरुपी नोकरीसाठी ५ लाख रुपये लागतील. त्यासाठी पोलीस कॉलनीत घरी येऊन भेटण्यास सांगितले.
सुनीलने मोबाईलवरून दिनेश राठोड याच्याकडे विचारणा केली असता शेख जाफर यानेच बँकेत नोकरी लावून दिली असून, लवकरच कायमस्वरुपाची आॅर्डर मिळणार असल्याचे सांगितले. जाफरच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने सुनील, राजेंद्र आणि संतोष यांना घेऊन जाफरच्या घरी गेला. त्यावेळी जाफर याने त्याच्या दोन बायकांची ओळख करून दिली. शेख हसिना ही पोलीस खात्यात तर दुसरी पत्नी शबाना ही आश्रमशाळेत नोकरी करीत असल्याचे सांगितले. नोकरी लावून देण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले.
यानंतर सुनीलने पैशाची जमवाजमव करून फेब्रुवारी २०१४ मध्ये जाफरचे घर गाठले. जाफर आणि हसिना यांच्याकडे रोख ५ लाख रुपये दिले. मार्च २०१४ मध्ये सुनील व त्याचा लहान भाऊ संतोष, सचिन आणि दिगंबर चव्हाण असे चौघे जण जाफरच्या घरी गेले. दिगंबर चव्हाणने ६ लाख, सचिन गवळी याने साडेतीन लाख रुपये नोकरीसाठी दिले. त्यावेळी शेख हसिना आणि जाफर यांनी आठ दिवसांत शिपाई पदाची आॅर्डर देण्याची ग्वाही दिली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सुनीलने पोलिसात धाव घेतली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल
सुनीलने पैशासाठी जाफर आणि हसिना यांच्याकडे तगादा लावला. त्यानंतर जाफरने पत्नी शबाना यांच्या सिल्लोड येथील हैदराबाद बँकेचे ५ लाख, ६ लाख आणि ३ लाख ५० हजार असे एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचे चेक दिले. हे चेक बँकेत टाकले असता अनादरित झाले. वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नसल्याने शेवटी सुनीलने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक नवले व पथकाने या तक्रारीची तपासणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात शेख जाफर, शेख हसिना, शेख शबाना या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.