मध्य प्रदेशच्या अशोकनगर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मागील काही महिन्यांपासून गँगरेप होत असल्याचं उघड झालं आहे. मुलीवर तिचा मावस भाऊ आणि त्याचे ४ मित्र गँगरेप करत होते. जेव्हा या पीडित मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिला आणि नवजात मुलीला विहिरीत फेकलं तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत.
२० सप्टेंबरच्या दिवशी कदवाया गावात हनुमान मंदिराजवळील एका विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला होता. लोकांनी हा मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाचा मृतदेह बाहेर काढला आणि या घटनेचा गुन्हा नोंद करून घेतला. नवजात मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं. तेव्हा या मुलीला जिवंतच विहिरीत फेकून दिलं त्यानंतर पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना अलीकडेच गावात १४ वर्षीय मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा मुलीनं पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी या मुलीला बालसुधारगृहात पाठवलं आहे.
मुलीनं दिला पोलिसांना जबाब
पीडित मुलीनं पोलिसांना सांगितले की, ती वडिलांसोबत गावात राहते. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये एकेदिवशी घरात एकटी होती. वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातच राहणारा मावस भाऊ छोटू विश्वकर्मा घरी आला. छोटूनं पाहिलं असता घरात कुणीच नव्हतं. त्यानंतर छोटूनं तिच्यासोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली तर तुला ठार करेन असं छोटूनं सांगितलं. त्यानंतर पुन्हा छोटूनं पीडितेला बाहेर घेऊन गेला. तिथं त्याचा मित्र राहुलदेखील होता. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अन्य ३ जणांसोबत पीडितेला संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मागील ११ महिन्यापासून आरोपींनी या पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यावेळी ही पीडित मुलगी गर्भवती झाली. वडिलांचं या गोष्टीकडे लक्ष नव्हतं.
भीतीमुळं नवजात मुलीला विहिरीत फेकलं
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, २० सप्टेंबरला ती शौचालयाला गेली होती तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. भीतीपोटी मी नवजात मुलीला विहिरीत फेकलं. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी २५ सप्टेंबरला छोटू, राहुल, सचिनसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात ३७६ आणि पॉस्को अंतर्गत कारवाई केली आहे.