दौंडला २१ लाख रुपयांचा १४० किलो गांजा जप्त; एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 01:23 AM2020-06-07T01:23:56+5:302020-06-07T01:24:52+5:30
गिरिम परिसरात गांजाची शेती केली जात असल्याची मिळाली होती माहिती
दौंड : दौंड परिसरातील गिरिम येथे मुद्देमालासह २१ लाख रुपये किमतीचा १४० किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. दत्तू शिंदे ( वय ४७, रा. शिंदेवस्ती , गिरिम, ता.दौंड ) याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (दि. ५) रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गिरिम परिसरात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय पद्धतीने मिळाली होती.त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस आधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या अधिपत्याखाली पथकाची नेमणूक केली. दरम्यान, या पथकाने गिरिम परिसरात टेहाळणी केली असता दत्तू शिंदे या भागात गांजाची शेती करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना माहिती देण्यात आली. परिणामी, पुणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांचे संयुक्त पथक करण्यात आले. दरम्यान, या पथकाने गिरिमला छापा टाकला असता या ठिकाणी एका शेतात गुंगीकारक गांजा वनस्पतीची शेती करताना दत्तू शिंदे ही व्यक्ती सापडली. या शेतात गांजाची १७३ झाडे आढळून आली. या व्यतिरिक्त विक्रीसाठी ठेवलेल्या सुक्या गांजाच्या दोन गोण्या असा एकूण १४० किलो गांजा सापडला. साधारणत: मुदेमालासह २१ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट , दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, दत्तात्रय जगताप , कल्याण शिंगाडे , अण्णा देशमुख , किरण राऊत, अमोल देवकाते , सचिन बोराडे ,सुरज गुंजाळ , दिलीप भाकरे आदी पोलिसांचा छापा पथकात सहभाग होता.