Video : मुंबई पोलीस दलात पोस्टल बॅलेटद्वारे मतदानासाठी १६ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:02 PM2019-04-16T19:02:05+5:302019-04-16T19:05:06+5:30
यंदाच्या निवडणूकीत ही 16 हजार पोलिसांची मतं कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई - लोकसभा निवडणूकीमुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. यंदाच्या निवडणूकीत सहभागी होण्यासाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी ही मोठी उत्सुकता दाखवली आहे. मुंबई पोलीस दलातील १६ हजार पोलिसांनी यंदाच्या निवडणूकीत पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत केवळ ५०० कर्मचाऱ्यांनी या टपाली मतदानासाठी अर्ज केले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत ही 16 हजार पोलिसांची मतं कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पोस्टल बॅलेट मतदान म्हणजे काय ?
मुंबई पोलीस दलात ५३ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण तापलेले असताना. याच संधीचा फायदा घेऊन समाजकंटकांकडून शहरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच मुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या निवडणूकीच्या काळात रद्द केल्या आहेत. अनेकदा बंदोबस्तामुळे मुंबई बाहेर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. शहरात जवळपास राहणाऱ्या पोलिसांना मतदान करायला जाण्यासाठी त्या दिवशी काही तासांची सूट दिली जाते. मात्र, ज्या पोलिसांना मतदानाचा हक्का बजावता येत नाही. त्यांच्याकडून टपाली मतदानाचे फॉर्म-१२ भरून घेतले जातात.
पोस्टल बॅलेट मतदानात २० पटीने वाढ
अनेकदा ड्युटी करून कंटाळलेले पोलीस कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कागदी प्रक्रिया करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. २०१४ च्या निवडणूकीत फक्त ५०० जणांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत पोलीस फासरे सहभागी होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यंदाच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोलीस पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत 16 हजार पोलिसांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांमधील मतदान करण्याबाबतची उत्सुकता पाहून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यातच मतदानाचे फॉर्म -१२ उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. हे सिलबंद फॉर्म त्या त्या मतदार संघात पाठवले जातात. या मतांची स्वतंत्र मोजणी होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करण्याचीही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या निवडणूकीत वाढलेले हे पोस्टल बॅलेट मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.