चोरट्यांचे ‘कल्याण’, १७ चोऱ्या; सर्वाधिक घटना पश्चिम भागात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 01:17 AM2020-10-31T01:17:18+5:302020-10-31T01:17:34+5:30
Crime News : कल्याणमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, महिनाभरात अशा १७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक घटना या पश्चिमेत घडलेल्या आहेत.
कल्याण : धूम स्टाइलने मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार चोरट्यांकडून घडत असताना आता चोरट्यांनी पादचाऱ्यांचे मोबाइल लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, महिनाभरात अशा १७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक घटना या पश्चिमेत घडलेल्या आहेत.
मोबाइल चोरीच्या घटना प्रामुख्याने बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी घडतात. परंतु, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून चोरी करण्याचे प्रकार चोरट्यांकडून सुरू झाले आहेत. धूम स्टाइलने दुचाकीवरून येऊन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारीवरून दिसत आहे.
अनलॉकमध्ये वाहनचोरीचे प्रमाण एकीकडे वाढले असताना ऑक्टोबरमध्ये मोबाइल चोरीच्या घटनाही सर्रास घडत आहेत. महिनाभरातील घटनांचा आढावा घेता कल्याण शहरात आतापर्यंत १७ घटना घडल्या आहेत. पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घटना वगळता अन्य १४ घटना पश्चिमेतील खडकपाडा, महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. यातील सर्वाधिक १२ घटना या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. महात्मा फुले चौक पोलिसांनी मोबाइल चोरट्यांच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत.
चाकूच्या धाकानेही लूटमार
चाकूच्या धाकाने तसेच मोबाइलवर बोलत असताना मोबाइल हिसकावून चोरीचे प्रकार सुरू असल्याने पादचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. एकीकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांवर काहीसा अंकुश आणण्यात कल्याणच्या पोलिसांना यश आले असताना आता मोबाइल चोरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.