नगरसेवक संजय तेलनाडे बंधूसह १८ जणांना ‘मोक्का’, इचलकरंजी परिसरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:23 PM2019-05-20T13:23:54+5:302019-05-20T13:24:14+5:30
कोल्हापुरातील कळंबा येथील मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय तेलनाडे साथीदारांसह पसार झाला आहे.
कोल्हापूर : खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी ‘मोक्का’ कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. या कारवाईने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरातील कळंबा येथील मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय तेलनाडे साथीदारांसह पसार झाला आहे. मोबाईल बंद करून तो आपले अस्तित्व लपवून राहत आहे. त्याचा साथीदार जावेद दानवाडे, नूर सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. त्याने इचलकरंजीसह जयसिंगपूर, शिरोळ, कर्नाटकात मटक्याचे एजंट पेरले आहेत. तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक केली होती. त्यातून तो निर्दोष बाहेर पडला आहे. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. इचलकरंजीमध्ये तो मटका किंग राकेश अग्रवाल याच्याशी हातमिळवणी करून मटका-जुगार चालवितो. येथील सराईत ‘एस.टी.’ गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे.
अनेक बेकार तरुणांना छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करून देत तो त्यांची फौज आपल्याभोवती फिरवितो. त्यामुळे इचलकरंजीमध्ये त्याला ‘सरकार’ म्हणून ओळखले जाते. जमिनी, स्थावर मालमत्ता, आलिशान गाड्या, आदी कोट्यवधींची माया त्याने अवैध व्यवसायांतून मिळविल्याची इचलकरंजीमध्ये चर्चा आहे. नुकताच शहापूर पोलीस ठाण्यात त्याच्यासह भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये, हृषिकेश लोंढे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, अरिफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, दिगंबर शिंदे यांच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेलनाडेचे उपद्व्याप वाढत आहेत. त्याला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याच्यासह १८ साथीदारांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी ‘मोक्का’ कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता.