१९ वर्षीय शिक्षिकेवर मुख्याध्यापकाने केला बलात्कार; खेरवाडी पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:14 PM2019-02-18T17:14:40+5:302019-02-18T17:15:08+5:30
खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला
मुंबई - वांद्रे पूर्वेकडील एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकाने १९ वर्षीय शिक्षिकेचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने स्पाय कॅमेऱ्यात आपल्यावर झालेला दुर्दैवी प्रकार टिपला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पीडित तरुणी ही ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत ती जुलै २०१७ पासून पार्ट टाईम शिक्षिकेचं काम करत होती. मात्र, शैक्षणिक काळात ६ वर्षभर मुख्याध्यापकाने विद्यार्थी दशेत असताना तिचा वारंवार विनयभंग केला होता. शाळेत शिक्षिकेचं काम करण्यासाठी रुजू झाल्यानंतरही कामानिमित्त घरी बोलावून पीडित मुलीवर मुख्याध्यापकाने बलात्कार केला. बलात्काराबाबत कोणास सांगितल्यास तुझ्या लहान बहिणीला शाळेतून काढून टाकण्यात येईल अशी धमकी मुख्याध्यापकाने दिली होती. कारण ज्या शाळेत पीडित शिक्षिका होती त्याच शाळेत तिची लहान बहीण शिक्षण घेत होती. लहान बहिणीच्या शिक्षणाचं नुकसान होईल म्हणून बरेच दिवस पीडित शिक्षिका शांत होती. मात्र, नंतर याबाबत तिने उपमुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षकांना माहिती दिली होती. मात्र, कुणीही तिच्यावर विश्वास ठेवेना. हतबल झालेल्या पीडितेने अखेर मैत्रिणीच्या वडिलांना घडला प्रकार सांगितलं. त्यानंतर त्यांनी तिला स्पाय कॅमेऱ्याने सर्व प्रसंग टिपण्याची युक्ती सांगितली. त्याप्रमाणे पीडितेने पुन्हा मुख्याध्यापकाने तिला घरी बोलावले त्यावेळी स्पाय कॅमेऱ्यात सर्व प्रकार पीडितेने टिपला. मात्र, मुख्याध्यापकाला वाचविण्यासाठी अनेकांनी तिला कॅमेऱ्यातील शूट शाळेच्या प्रशासनाकडे देण्यास सांगितले. तरीदेखील तिने तसे न करता खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याबाबत खेरवाडी पोलीस तपास करत असून लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.