बनावट खाते उघडून २१.५० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:32 AM2018-12-28T06:32:51+5:302018-12-28T06:33:06+5:30
बँकेत बनावट खाते उघडून एका खातेदाराचे कर्ज दुसऱ्याच्या खात्यावर वळते करून २१ लाख ५० हजारांची बँक आणि खातेदाराची फसवणूक करणाºया किरण निगुडकरसह सहा जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : बँकेत बनावट खाते उघडून एका खातेदाराचे कर्ज दुसऱ्याच्या खात्यावर वळते करून २१ लाख ५० हजारांची बँक आणि खातेदाराची फसवणूक करणाºया किरण निगुडकरसह सहा जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बोरीवली येथील एका गृहिणीला हा धक्कादायक अनुभव आल्यानंतर तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार एलआयसी हाउसिंग फायनान्स, नौपाडा, ठाणे शाखेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांशी संगनमत करून किरण निगुडकर, प्रमोद राणीम, अनिल पाटील आदींनी महिलेच्या नावाने मंजूर झालेल्या गृहकर्जाच्या रकमेतून २१ लाख ५० हजारांचा धनादेश तिला किंवा रूममालक संदीप डुरे यांना सुपुर्द करण्याऐवजी तो परस्पर त्रयस्थ व्यक्तीकडे दिला. तसेच कट करून डुरे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे बँक आॅफ इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील शाखेत बनावट खाते उघडून त्यात हा धनादेश वटवून पैसे काढून घेतले. यातून या तक्रारदार महिलेची आणि रूममालक अशा दोघांची २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. फेब्रुवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१८ या काळात हा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर २६ डिसेंबर रोजी या प्रकरणी या महिलेने तक्रार दाखल केली.