मुंबई :
मोबाइल गेमिंग ॲपद्वारे खेळ खेळण्यासाठी लोकांना त्या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करायला सांगून कालांतराने ते पैसे हडपणाऱ्या कोलकातास्थित ई-नगेट कंपनीच्या ताब्यात असलेले २२ कोटी ८२ लाख रुपये मूल्याचे १५० बिटकॉईन्स सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी जप्त केले. या कंपनीवर गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे.
देशातील लाखो लोकांना गंडा घातलेल्या ई-नगेट कंपनीचा मालक आमीर खान याच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने आतापर्यंत त्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. ही सर्व मालमत्ता त्याने आपल्या ई-नगेट कंपनीच्या ॲपमध्ये घोटाळा करत जमविली आहे.
काय आहे प्रकरण?- कोरोना काळात कोलकातास्थित आमीर खान नावाच्या व्यक्तीने काही मित्रांच्या मदतीने ई-नगेट ही मोबाईल ॲपद्वारे गेमिंग सुविधा देणारी कंपनी सुरू केली.- हे ॲप डाऊनलोड करत त्यावर गेम्स खेळणाऱ्या लोकांना घसघशीत, आकर्षक बक्षिसे देण्यात आली होती.- सुरुवातीपासूनच या ॲपवरील खेळ खेळण्यासाठी कंपनी पैशांची आकारणी करत होती.- ज्याला या ॲपमधील खेळ खेळायचे आहेत त्याला त्या ॲपमध्ये असलेल्या वॉलेटमध्ये पैसे जमावे करावे लागत होते. समजा एखाद्या व्यक्तीला ते ॲप कालांतराने वापरायचे नसेल तर त्याला त्या ॲपच्या वॉलेटमधून उरलेले पैसे परत केले जात होते.