कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून २२ लाखाचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:34 PM2018-10-30T22:34:35+5:302018-10-30T22:34:53+5:30
दाबोळी विमानतळावर सारजाहून आलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडे मंगळवारी (दि. ३०) पहाटे ७५५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याची बिस्किटे सापडली.
वास्को: दाबोळी विमानतळावर सारजाहून आलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडे मंगळवारी (दि. ३०) पहाटे ७५५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याची बिस्किटे सापडली. हा प्रवासी मूळचा केरळमधील रहिवाशी असून त्यांने तस्करी करून आणलेल्या या सोन्याची किंमत २२ लाख ४ हजार रुपये असल्याची माहिती कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र पी यांनी दिली.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. एअर अरेबियाचे ‘जी ९०४९२’ हे विमान सारजाहून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर या विमानातून आलेल्या प्रवाशांची कस्टम विभागाकडून तपासणीस सुरवात करण्यात आली. तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना या विमानातून आलेल्या एका प्रवाशावर संशय आल्याने त्यांनी सुरुवातीला त्याच्याशी विचारपूस केली असता त्याच्याकडून योग्य उत्तरे देण्यात येत नसल्याचे जाणविल्याने त्याच्यावरचा संशय आणखी वाढला. यानंतर कस्टम अधिका-यांनी त्या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता त्यांने लपवून आणलेली तीन सोन्याची बिस्किटे त्यांना आढळून आल्या. तीनही बिस्किटांची एकूण वजन ७५५ ग्रॅम असल्याची माहिती सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र यांनी दिली. तसेच, या सोन्याची किंमत २२ लाख ४ हजार ५९२ रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.
एप्रिल २०१८ पासून सहा महिन्यात दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने विविध कारवाईत एकूण ५ किलो ७५० ग्रॅम इतके तस्करीचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम १ कोटी ७० लाख रुपये असल्याची माहिती कस्टमचे सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र यांनी दिली. तसेच कस्टम विभागाने विविध कारवाईत मागच्या सहा महिन्यात विविध प्रवाशांकडून ३६ लाख ३८ हजार रुपयांची विदेशी चलने जप्त केली असून ३८ लाख ०९ हजार रुपयांचे विदेशी सामान मागच्या सहा महिन्यात दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने जप्त केले आहे.