मुंबईवरील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले तर ३०८ लोक गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, तुकाराम ओंबाळे या जिगरबाज पोलिसाने आपल्या प्राणाची आहुती देत पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडून दिले होते. स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलून इतर पोलिसांच्या प्राणाचे रक्षण ओंबळे यांनी केले.
दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला झाल्यानंतर शहिद तुकाराम ओंबाळे यांना वॉकीटॉकी वर संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत निघाले आहेत. हल्ला झाला तेव्हा वेळी शहीद ओंबाळे गिरगाव चौपाटीवर ड्यूटीवर होते. ओंबाळे आणि आणखी काही सहकारी चौपाटीवर पोहोचले. नाकाबंदीदरम्यान कसाब व त्याच्या साथीदार अबू इस्माईल गोळीबार करत स्कोडा कारमधून येत होते. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहोचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला अडविले व पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबच्या साथीदाराने ओंबाळेवर गोळ्या झाडल्या. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर झाला. विधान भवनाकडून रायफलच्या धाकावर चोरलेली स्कोडा कार घेऊन अतिरेकी मलबार हिलच्या दिशेने निघाले होते. साडेबाराच्या ठोक्याला ही कार गिरगाव चौपाटीकडे अडवण्यात आली. कारच्या बाहेरील हेडलाइट बंद करून आतील लाइट सुरू करण्याच्या आम्ही सूचना पोलिसांकडून दिल्या. मात्र इस्माईलने अप्पर लाइट मारली. तो प्रकाश डोळ्यावर आल्याने पोलिसांना नंबर दिसत नव्हता. पोलीस गाडीभोवती येत असल्याचे पाहून इस्माईलने ती वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार दुभाजकाला धडकून कारचे चाक जाम झाले. रागाच्या भरात इस्माईलने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईलचा मृत्यू झाला. ही बाब बाहेरच्या पोलिसांना माहिती नव्हती.
26/11 Terror Attack: ...तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती
26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...
गाडीत बसलेला कसाब बाहेर आला आणि पायात पाय अडकून पडला. त्याचवेळी तुकाराम ओंबळे यांनी कसाबला एके-४७ सह पाहिले आणि पकडण्यासाठी मिठी मारली. कसाब त्यांना ढकलत होता, परंतु त्यांची मगरमिठी सुटायला तयार नव्हती. म्हणून त्याने ५ राउंड फायर केले. पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. आमचा संजय गोविलकर पुढे सरसावताच कसाबने आणखी एक राउंड फायर केला. तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.