निर्दयतेचा कळस! ३ वर्षाच्या चिमुरड्याला मोलकरणीनं लाथाबुक्क्यांनी मारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 10:36 AM2020-09-01T10:36:32+5:302020-09-01T10:42:06+5:30
कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. याठिकाणी राहणारे एक दाम्पत्य मोलकरणीच्या जीवावर ३ वर्षीय चिमुरड्याला ठेऊन घराबाहेर गेले होते.
कानपूर – सध्याच्या काळात आई-वडील दोघंही नोकरी करत असल्याने घरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी केअर टेकर ठेवली जाते, त्याच पालकांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी कानपूरमधून समोर आली आहे. याठिकाणी इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या ३ वर्षाच्या मुलाला मोलकरणीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कैद झाल्याने हे उघड झालं.
कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. याठिकाणी राहणारे एक दाम्पत्य मोलकरणीच्या जीवावर ३ वर्षीय चिमुरड्याला ठेऊन घराबाहेर गेले होते. मात्र आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर या मुलासोबत जे घडलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. मोलकरणीने लाथा-बुक्क्यांनी आणि चप्पलेने मुलाला बेदम मारलं. संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कैद झाली. ज्यावेळी मुलाचे आईवडिल घरी परतले तेव्हा मुलगा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्याजवळ गेला. त्याने मोलकरणीकडे हात दाखवत इशारा केला. तेव्हा नेमकं काय घडलं याची काहीच कल्पना त्यांना नव्हती.
यानंतर वडिलांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मोलकरणीने मुलाला बेदम मारल्याचं दृश्य पाहून आईवडिलांना धक्का बसला, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. रतन ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये राहणारे सौरभ मानसिंह रेल्वेच्या कार्यालयात उपअधीक्षक म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी सोनिया सिंह या अकाऊंटेट आहेत. दोघंही नोकरी करतात. त्यासाठी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी रेणू नावाची मोलकरीण ठेवली.
सौरभ सिंह यांना दोन मुलं आहेत. अयांश(३) आरू(२) असं या मुलांचे नाव आहे. रविवारी दुपारी छोटा मुलगा आरूच्या डोळ्यात जखम झाल्याने आईवडिल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. त्यावेळी अयांशला घरीच ठेवले. रेणू अयांशला सांभाळण्यासाठी फ्लॅटमध्ये आली होती. मात्र आम्ही घराबाहेर पडल्यानंतर अयांशला मोलकरणीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात अयांशच्या प्रायव्हेट पार्टलाही जखम झाली. जेव्हा सौरभ सिंह त्यांच्या पत्नीसह घरी परतले तेव्हा अयांश जोरजोरात रडत त्यांच्याजवळ आला.
त्यानंतर अयांशने रेणूकडे हात दाखवत इशारा केला. तेव्हा रेणू काहीच बोलायला तयार नव्हती. यानंतर आईवडिलांना शंका आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यात रेणू मुलगा अयांशला बेदम मारहाण करत असल्याचं दिसून आलं. तातडीने या घटनेची माहिती सौरभ सिंह यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी रेणूला अटक केली आहे. सौरभ सिंह यांच्या तक्रारीनंतर रेणूवर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.