नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी गुन्हे शाखेने ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर केलेल्या कारवाई मध्ये दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ४१ किलो वजनाच्या गांजासह एकूण ११ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी दिली आहे.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर रांजनोली नाका येथे काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, प्रफुल्ल जाधव, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र चौधरी,पोलिस हवालदार सुनिल साळुंखे,पोलिस नाईक सचिन जाधव,भावेश घरत,पोलिस शिपाई अमोल इंगळे, रोशन जाधव,रविंद्र साळुंखे यांनी रांजनोली नाका उड्डाणपूला खाली सापळा रचला असता.
त्यावेळी तेथे गांजाची विक्री करण्यासाठी कार मधून वाहतुक करणारे दोघे संशयित प्रसाद संतोश चवले वय २६ रा.गणेश नगर,कामतघर व किरण भक्ताया कोंडा वय २७ रा.पद्मानगर, भिवंडी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.त्यांच्या जवळून ४१ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा ,एक कार,दोन मोबाईल रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.