मुंबई - एअर इंडियाच्या विमानातील सीटमध्ये सोने लपवून तस्करी करण्याचा डाव कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाने उद्ध्वस्त केला आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या (एआययु) पथकाने वेळीच कारवाई करत सीटमध्ये लपवलेले 47 लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली आहेत.
अबुधाबीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती एआययूला मिळाली होती. विमानातील एका सीटमध्ये सोने लपवले असल्याची खबर एआययूच्या अधिकार्याला मिळाली. त्यानुसार विमान विमानतळावर लँड होताच पथकाने सीटची तपासणी करून लपवलेले 47 लाखांचे सोने जप्त केले. दरम्यान, या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी कोण करीत होते याचा आता शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.