हिवाळ्याच्या पर्यटन मोसमात गोव्यात 57 लाखांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:52 PM2018-11-19T19:52:45+5:302018-11-19T19:56:58+5:30
वर्षभरात अमली पदार्थाची 182 प्रकरणं; गांजाची जागा आता सिंथेथीक ड्रग्सने घेतली
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यात पर्यटनाच मोसम सुरु होऊन ४० दिवसही उलटले नाहीत. मात्र, या ४० दिवसांच्या कालावधीत गोव्यात तब्बल 57 लाखांचे अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. ऑफ सिझनमध्ये गोव्यात गांजा पकडण्याची प्रकाराने अधिक होती. मात्र, पर्यटनाचा सीझन सुरु झाल्यानंतर गांजाची जागा आता चरस आणि सिंथेथीक ड्रग्सने घेतली आहे.
रविवारी कळंगूट पोलिसांनी फ्रँक नाथानील या 32 वर्षीय नायजेरियनाला अटक करुन त्याच्याकडून 11 लाखांचा अमली पदार्थ जप्त केला होता. त्यात एमडीएमए, मॉर्फिन, एम्फटामाईन, चरस आणि एलएसडी पेपरचा समावेश होता. यापूर्वी 1 नोव्हेंबरला अंजुणा येथे चिडी ऑन्कोकोव या नायजेरियनाला अटक करुन त्याच्याकडून दोन लाखांचा सिंथेथीक ड्रग पकडला होता. विशेष म्हणजे या आरोपीकडे गोव्यात राहण्याचा कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचेही उघडकीस आले असून कळंगूट पोलिसांनी त्याच्याविरोधात बेकायदा वास्तव्य करुन राहिल्याबद्दल नवीन गुन्हा नोंद केला आहे.
गोव्यातील पर्यटन मोसम 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेला असून 18 नोव्हेंबरपर्यंत एकूण अमली पदार्थ प्रकरणांची 57 प्रकरणो नोंद झाली असून वेश्या व्यवसायाशीसंबंध असलेल्या सात प्रकरणांची नोंद झालेली आहे. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक प्रकरण उत्तर गोव्यातील किनारपट्टीत नोंद झाली असून कळंगूट ते वागातोर या पट्टय़ात ती अधिक सापडली आहेत.
ऑक्टोबर महिन्यात अमली पदार्थाशी संबंधित असलेली 16 प्रकरणांची गोव्यात नोंद झाली होती. यावेळी 16 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात तिघां विदेशी नागरिकांचा समावेश होता. वागातोर येथे 27 ऑक्टोबर रोजी टर्कीच्या मुस्ताफा सिनॉस या नागरिकाला अटक करुन त्याच्याकडून 2.47 लाखांचा चरस व एमएमडीए हा पदार्थ जप्त केला होता. 7 ऑक्टोबर रोजी अल फरहान या 23 वर्षीय ओमानच्या युवकाला दाबोळी विमानतळावर अटक केली असता त्याच्याकडे 8 लाख रुपयांचा (दोन किलो) चरस सापडला होता. तर 5 ऑक्टोबर रोजी अंजुणा येथे ओबे सनी या नायजेरियन युवकाला अटक केली असता त्याच्याकडून 35 हजारांचा चरस जप्त करण्यात आला होता.
अमली पदार्थ विभागाचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता, गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर विदेशी नागरिकांमध्ये प्रचलित असलेल्या चरस आणि सिंथेथिक ड्रग्सची प्रकरणो वाढली आहेत. हे त्यांनी काबुल केले. सिझन सुरु होण्यापूर्वी गोव्यात बहुतेक अमली पदार्थाची प्रकरण गांजाशी निगडीत होती. असे जरी असले तरी अमली पदार्थ विक्रेत्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी उपाययोजना हाती घेतली आहे असे ते म्हणाले.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये गोव्यात तब्बल 182 अमली पदार्थ विषयक गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आली आहेत. आतापर्यंत अशा प्रकरणात 37 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 23 नागरीक नायजेरियन आहेत.